सायबर भामट्यांचा ‘शेअर’ तेजीत! शेअर मार्केटच्या आमिषाने ८५६ गुन्हे; ज्येष्ठ नागरिक मुख्य लक्ष्य
शेअर मार्केटमध्ये झटपट नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्यांनी आपला ‘शेअर’ प्रचंड वाढवला असून, अलीकडच्या काळात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ८५६ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सोशल मीडियावरील जाहिराती, व्हॉट्सॲप ग्रुप, बनावट अॅप्स व कॉलद्वारे विश्वास संपादन करून भामटे नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत. “गॅरंटीड रिटर्न” आणि “तज्ज्ञ सल्ला” या शब्दांच्या जाळ्यात अनेकांनी आयुष्याची पुंजी गमावल्याची धक्कादायक वास्तवस्थिती समोर येत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक हे या सायबर जाळ्याचे मुख्य बळी ठरत असून, शेअर मार्केटची मर्यादित माहिती, तंत्रज्ञानातील अडचणी व अधिक नफ्याची अपेक्षा याचा गैरफायदा घेतला जात आहे. अनेक प्रकरणांत सुरुवातीला थोडा नफा दाखवून विश्वास निर्माण केला जातो आणि नंतर मोठी रक्कम गुंतवायला लावून खात्यातील पैसे गायब केले जातात. त्यामुळे नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता अधिकृत माध्यमांतूनच गुंतवणूक करावी व संशयास्पद कॉल, लिंक व अॅप्सपासून सतर्क राहावे, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.