पालकांना दिलासा! RTE अंतर्गत शाळा नोंदणीस २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील पालकांसाठी दिलासादायक बातमी असून RTE (शिक्षणाचा हक्क) अंतर्गत शाळा नोंदणीस आता २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यासह अमळनेर शहर व परिसरातील अनेक शाळा विविध कारणांमुळे वेळेत नोंदणी करू शकले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने घेतलेला हा निर्णय पालक व विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.
RTE अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. अमळनेर शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शाळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश नोंदणी व लॉटरी प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना शाळा वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुदतवाढ मिळाल्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शाळांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातील पालकांसाठी ही सुवर्णसंधी असून, RTE अंतर्गत प्रवेशामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग खुला होणार आहे. वेळेवर नोंदणी केल्यास भविष्यातील अडचणी टळणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे.