अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अमळनेर येथे समर्पण दिन उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
स्वराज्य जननी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युवाशक्तीचे प्रेरणास्थान श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे अमळनेर येथे समर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्षा सौ. ताईसाहेब स्मिता चंद्रात्रे होत्या, तर प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश देशमुख व श्री भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ व ग्राहक पंचायतचे संस्थापक स्व. बिंदुमाधव जोशी (नाना) यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना श्री सतिश देशमुख यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची धगधगती राष्ट्रभक्ती व समर्पित समाजसेवेची विचारधारा आजही समाजाला दिशा देणारी असल्याचे ठळक उदाहरणांसह स्पष्ट केले. तर श्री भाऊसाहेब देशमुख यांनी राष्ट्रीय युवा दिन व समर्पण दिनाचे महत्त्व सांगत स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांवर मुक्त विवेचन केले. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक संघटन मंत्राने ॲड. भारती अग्रवाल यांनी केली व प्रास्ताविक सादर केले.
या समर्पण दिनाचे औचित्य साधत समाजसेवेचा जिवंत प्रत्यय देण्यात आला. जिल्हा सहसचिव श्री मकसूद बोहरी, सौ. मेहराज भाभी व कुटुंबीयांनी स्वतः शिवलेली २५ ब्लँकेट्स पुणे येथील आभाळमाया वृद्धाश्रम मधील निराधार वृद्धांसाठी सुपूर्द करण्यात आली. गेल्या १५ वर्षांपासून निस्वार्थ वृद्धसेवेत अग्रेसर असलेल्या डॉ. अपर्णा देशमुख यांच्या कार्याला यावेळी मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन ॲड. भारती अग्रवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. ज्योती भावसार यांनी केले.