शेतकरी-वंचितांचा संताप उफाळला! अमळनेर तहसीलसमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बोंबा-बोंब आंदोलन..
अमळनेर : विक्की जाधव.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने क्रांतिकारी कामगार शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयात बोंबा-बोंब निवेदन सादर केले. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना यांसह विधवा, परितक्त्या, ज्येष्ठ नागरिक व मजूर वर्गासाठी असलेल्या योजनांचे अनुदान वेळेवर न मिळाल्याने हजारो लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. DBTच्या नावाखाली लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार गंभीर असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दुसरीकडे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊनही अद्याप पीकविमा व नुकसानभरपाई मिळालेली नाही. कागदोपत्री योजना सुरू असल्या तरी प्रत्यक्षात शेतकरी, शेतमजूर व गरजू घटकांना न्याय मिळत नसल्याने असंतोष वाढत आहे. “योजना कागदावरच राहणार का?” असा सवाल उपस्थित करत संघटनेने प्रशासनाला जाब विचारला आहे.या निवेदनात सर्व प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा क्रांतिकारी कामगार शेतकरी संघटना तीव्र आंदोलनाचा इशारा देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर शेतकरी-वंचितांचा उद्रेक अटळ असल्याचे चित्र अमळनेरमध्ये दिसू लागले आहे.