अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती भरतीवर मोठा प्रश्नचिन्ह!
अमळनेर : विक्की जाधव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीक्षा व नोकरभरती प्रक्रियेबाबत गंभीर बाब समोर आली असून पुणे येथील पणन संचालक श्री. संजय कदम यांच्या दिनांक १९/०१/२०२६ रोजीच्या अधिकृत पत्रानुसार, शासनाकडून नवीन धोरण निश्चित होईपर्यंत राज्यातील कोणत्याही बाजार समितीत परंपरागत नियुक्त्यांना मान्यता देऊ नये तसेच नविन भरतीस परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अमळनेर बाजार समितीतील परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी विशेष दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले असून, शासन आदेशाच्या विरोधात ही प्रक्रिया असल्यास संबंधित उमेदवारांनी तत्काळ परीक्षा शुल्क परत मागून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून परीक्षा राबवली जात असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
दरम्यान, खोटी आश्वासने देऊन, नियमबाह्य मार्गाने भरती होईल असा भास निर्माण करून गरीब व गरजू तरुणांची फसवणूक केली जात आहे, असा गंभीर आरोप चर्चेत आहे. या प्रकरणामुळे बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणाकडे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.