अमळनेर तालुक्यातील चर्मकार समाजाची वज्रमुठ- एक फेब्रुवारीला एक गाव एक मिरवणुकीचा निर्धार
अमळनेर : विक्की जाधव
शहर व तालुक्यातील ग्रामीण चर्मकार समाजाची येऊ घातलेल्या श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्ताने मंगळग्रह संस्थानाच्या सभागृहात विचार-मंथन बैठक मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ.डिगंबर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. देशात लहान-मोठे समाज आपल्या विविध मागण्यांसाठी व हक्कासाठी एकत्र संघटीत झाले असून चर्मकार समाज नेहमीच असंघटित राहून विभागलेला होता.त्यामुळे ही खंत समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला लागून होती.जो तो आपापल्या वस्तीनुसार श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरा करत होते.त्यामुळे हे कुठंतरी थांबवुन सगळ्यांनी एकाच जागेवर येऊन एकसंघ राहून शहरात एकच भव्य दिव्य शांततामय वातावरणात शोभायात्रा काढावी असा ठाम निर्णय सर्व समाज बांधवांनी घेतला.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.डिंगबर महाले,माजी नगरसेवक नरेश कांबळे,एकनाथ मोरे,प्रविण वाघ,साहेबराव चव्हाण,गणेश जाधव,रवींद्र ठाकरे,रवींद्र साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. सागर मोरे यांनी आपल्या मनोगतातुन अमळनेर शहरात सर्व संतांचे स्मारक आहेत मात्र आपल्या समाजाची एकजूट नसल्याने जगाला मन चंगा तो कठोती मे गंगा चा संदेश देणारे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे स्मारक शहरात नसल्याचे त्यांनी याविषयी खंत व्यक्त करून नगरसेवक डॉ.महाले यांना नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात योग्य जागी सुंदर स्मारक निर्माण करण्याची विनंती केली.डॉ.महाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला एकसंघ राहण्याची विनंती केली.एकसंघ राहू तरच आपण आजच्या परिस्थितीत टिकाव धरू शकतो.शहरात सर्वत्र विविध साधू-संत आणि समाज सुधारकांची स्मारके आहेत मात्र,अनेकदा मागणी करूनही संत रोहिदास महाराज निर्माण केले गेले नाही.त्यांचा इतिहास व थोरवी माहिती नसल्याने कदाचित असे घडले असावे असे मत व्यक्त केले मात्र आता खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील,नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर यांना निवेदन देऊन वर्षभरात संत रोहिदास महाराजांचे स्मारक निर्माण करण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुनील पाटील व कमलेश विसावे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बिऱ्हाडे तर सूत्र संचालन दंगलदास सोनवणे यांनी केले.एक फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मरीमाता मंदिराजवळील संत रोहिदास महाराज यांच्या मंदिरात सामूहिक पूजनाचा कार्यक्रम होईल. तेथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन मिरवणूक माळी वाडा, वाडी चौक,सराफ बाजार,मोठा बाजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे गांधलीपुरा येथे सांगता होईल.तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधवांनी कुटुंबासोबत जयंती उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.