कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात
कापडणे (ता. जि. धुळे) येथे दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सत्यशोधक विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहायला मिळाली. येथील रहिवासी दिनकर माळीसर (खलाणे) यांच्या मातोश्री स्व. कै. सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी) यांचा दशपिंड (दशक्रिया) विधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापित केलेल्या सत्यशोधक समाजोक्त पद्धतीने पार पडला. हा विधी सत्यधर्मीय विधीकर्ते शिवदास महाजन (एरंडोलकर) यांनी संपन्न केला. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार यांनी महात्मा फुले यांनी दिलेल्या मूळ सांस्कृतिक मार्गाचे महत्त्व विषद करत बहुजन समाजाला धार्मिक भीती दाखवून होणाऱ्या आर्थिक शोषणावर परखड प्रबोधन केले. धार्मिक विधींसाठी भटजीची गरज नसून “आमचे विधी आम्हीच करू” हा फुलेंचा विचार आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘सत्यधर्माच्या अखंडा’चे सामूहिक गायन करण्यात आले. कापडणे गावातील ग्रामस्थ, दिनकर माळी यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या विधीबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात असेच सत्यशोधक पद्धतीचे विधी करण्याची प्रतिज्ञा घेतली. सत्यशोधक समाज विधीपुस्तिकांच्या विक्रीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महादेव डांबरे, पोपटराव खैरनार, प्रा. भूषण पाटील आदी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.