प्रताप महाविद्यालयात ‘भारतीय सेना दिवस’ उत्साहात साजरा
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या संरक्षणशास्त्र विभागाच्या वतिने दिनांक 15 जानेवारी रोजी ‘भारतीय सेना दिवस’ (Army Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रांगोळी स्पर्धा आणि मनोगताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सैन्याप्रती आदर निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ के.एम.करिअप्पा आणि महाविद्यालयाचे प्रेरणास्थान श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन केले.
सेना दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्याची शौर्यगाथा आणि विविध चिन्हे रांगोळीच्या माध्यमातून साकारली. तसेच, मनोगत व्यक्त करण्याच्या सत्रात विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेचा इतिहास, त्याग आणि आजच्या काळातील सैनिकांचे महत्त्व यावर आपले प्रभावी विचार मांडले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना विभाग प्रमुख डॉ.रविंद्र मराठे, प्रा.विकास मोरे व प्रा.उषा मोरे यांनी सेना दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देतात म्हणूनच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देत प्रत्येकाने नेहमी सैन्याप्रती कृतज्ञ राहावे, असे आवाहन त्यांनी केले.