मध्यरात्री पंजाब नेशनल बँकेच्या एटीएम मशीनवर चोरट्यांनी मारला डल्ला..
अमळनेर विक्की जाधव.
शहरात खळबळ उडवणारी घटना घडली असून स्टेशन रोडवरील मंगलमूर्ती चौकात अनमोल सुपर शॉपीच्या शेजारी असलेल्या पंजाब नेशनल बँकेच्या एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी हात साफ केला. चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून आतमधील रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती असून, सकाळी नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच परिसरात एकच खळबळ उडाली. गजबजलेल्या भागातच चोरी झाल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या मोठ्या चोरीमुळे व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.