माणूस जिद्दीला पेटला की काहीही करू शकतो प्रताप अण्णा साळी यांची स्वीकृत सदस्यपदी निवड
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक तथा भद्रा प्रतीक मॉलचे सर्वोसर्वा प्रताप अण्णा साळी यांची अमळनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याने सर्वत्र समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीचे वृत्त समजताच कार्यकर्ते, हितचिंतक, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या नेतृत्वाला नगरपरिषदेत स्थान मिळाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
“जिद्द असली की माणूस काहीही साध्य करू शकतो” या उक्तीचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रताप अण्णा साळी होत. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी खचून न जाता जनसेवेचा वसा अधिक ठामपणे हाती घेतला. लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवत, सकारात्मक भूमिकेतून समाजासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार अखेर यशस्वी ठरला आहे.
व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि मदतीसाठी नेहमी पुढे असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रताप अण्णा साळी यांची अमळनेरमध्ये ओळख आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि लोकसंपर्कामुळेच त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड शहराच्या हिताची ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्रताप अण्णा साळी यांनी हा सन्मान अमळनेरच्या जनतेचा आणि आपल्या समर्थकांचा असल्याचे सांगितले. नगरपरिषदेमार्फत शहराच्या विकासासाठी, व्यापारी-उद्योग क्षेत्राच्या उन्नतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेरच्या राजकीय व सामाजिक जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, पुढील काळात शहराच्या प्रगतीसाठी नवे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.