अमळनेर नगरपरिषद निवडणूक : प्रशांत मनोहर निकम यांची उपनगराध्यक्षपदी निवड, कार्यकर्त्यांत आनंदोत्सव.
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेत नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, उपनगराध्यक्षपदी प्रशांत मनोहर निकम यांची निवड झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीमुळे अमळनेरच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसत असून, शिवसेनेच्या गोटात विशेष आनंद व्यक्त केला जात आहे. प्रशांत निकम यांनी उपनगराध्यक्ष पदाची बाजी मारताच शिवसेनेचे पदाधिकारी, माजी आमदार शिरीष दादा, अमळनेर मित्र परिवार तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके, मिठाई वाटप आणि शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी या विजयाचे जल्लोषात स्वागत केले. ही निवड म्हणजे संघटनात्मक मेहनत, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा यांचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नगरपरिषदेत सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेणारे, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व म्हणून प्रशांत निकम यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत असून, उपनगराध्यक्षपदावरून ते अमळनेरच्या विकासाला गती देतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
निवडीनंतर बोलताना प्रशांत निकम यांनी हा सन्मान जनतेचा आणि राष्ट्रवादी श.प गट अन. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याचे नमूद केले. अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी कार्यकाळाकडे आशेने पाहिले जात असून, शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक राजकारण घडेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.