प्रताप महाविद्यालयात एकपात्री नाट्य कार्यशाळेने रंगमंचीय काला अनुभवली
अमळनेर : विक्की जाधव.
येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित एकपात्री नाट्य कार्यशाळा दि. ७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. शिरपूर येथील सुप्रसिद्ध कलावंत प्रविण माळी यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून एकपात्री नाटकाची संकल्पना, ऐतिहासिक वाटचाल, व्यक्तिरेखा उभारणी, संवादफेक, आवाजातील चढउतार, देहबोली आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या प्रभावी पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. “एकपात्री नाटक म्हणजे कलाकाराच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे सशक्त प्रकटीकरण,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
दुपारच्या सत्रात प्रविण माळी यांनी सादर केलेले ‘आयतं पोयतं सख्यानं’ हे अहिराणी एकपात्री नाटक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले. भावभावना, भाषेचे लहेजे आणि रंगमंचावरील सहज वावर यांचे प्रभावी दर्शन या सादरीकरणातून घडले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्यासह उपप्राचार्य, मराठी विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना रंगमंचीय कलेचे प्रत्यक्ष अनुभवातून सखोल ज्ञान मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त झाली.