हातात दगड, मागे कॅमेरा; अन पुढे उद्ध्वस्त करिअर? मोर्चा, दंगलीत सामील होणारे तरुणांनो पुढे काय?
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरात उसळलेल्या राजकीय घडामोडींनी आता गंभीर वळण घेतले आहे. विजय सभेदरम्यान माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भाषणातील शब्दांचा विपर्यास करून तोडून-मोडून तयार करण्यात आलेली क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. या क्लिपमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांतून शहरातील वातावरण तापले आणि राजकीय लोक आणि कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांच्या समर्थकांनी पालिकेवर मोर्चा काढत थेट माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. काही काळ परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. मोठ्या प्रमाणावर गोंधळ व हातापायी होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला अन मोठा अनर्थ टाळला.

मात्र या मोर्चादरम्यान घडलेला एक प्रकार सध्या शहरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
एका तरुणाने हातात दगड घेऊन थेट शिंदे सेनेच्या कार्यालयावर मारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत तर दुसरा मारण्याचा तयारीत असून, त्याच क्षणी त्याच्या मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, भविष्यात गंभीर कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज हा व्हिडिओ केवळ व्हायरल कंटेंट म्हणून पाहिला जात असला, तरी उद्या विरोधी गटाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, तर त्या तरुणाचे काय? एफआयआर, पोलिस तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि गुन्हेगारी नोंद याचा थेट परिणाम त्याच्या शिक्षणावर, नोकरीवर आणि संपूर्ण करिअरवर होणार आहे. यामुळे “क्षणिक राजकीय रागासाठी आयुष्यभराची शिक्षा कोण भोगणार?” असा सवाल उपस्थित होत आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर उद्या या घटनेतून गुन्हा नोंदला गेला, तर त्या तरुणाच्या उद्ध्वस्त होणाऱ्या करिअरची जबाबदारी कोणता नेता घेणार आहे? हातात दगड देणारे, वातावरण भडकावणारे आणि सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करणारे? की नेते ते मात्र सुरक्षित आहेत, कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहेत ते सामान्य कुटुंबातील तरुण. यामुळेच अमळनेरच्या तरुणांसाठी हा केवळ इशारा नसून गंभीर आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या भडकाऊ पोस्ट्स, व्हिडिओ आणि आवाहनांवर भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्याआधी शंभरदा विचार करण्याची गरज आहे. कारण दगड हातात उचलणारा तुम्ही असाल, पण त्याचे परिणाम भोगणारेही तुम्हीच असणार आहात. नेते बदलतील, राजकारण सुरूच राहील; पण एक गुन्हा मात्र आयुष्यभर मागे लागण्याची भीती निर्माण करतो.
#मार्मिक पण निर्भीड