वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून बदनामीचा प्रयत्न माजी आमदार शिरीष चौधरी यांचे स्पष्टीकरण
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीनंतर आयोजित आभार सभेत केलेल्या भाषणाबाबत समाजमाध्यमांवर चुकीचा अर्थ काढून वैयक्तिक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. विरोधकांकडे कोणताही ठोस पुरावा नसताना पराभव स्वीकारण्याचे धैर्य नसल्याने द्वेषभावनेतून अफवा व खोटे आरोप पसरवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी आमदार चौधरी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या भाषणातील कोणतेही वक्तव्य कोणत्याही स्त्री, समाज किंवा व्यक्तीचा अपमान करणारे नव्हते. “स्त्री ही माझ्यासाठी सदैव माता-भगिनी समान असून त्यांचा सन्मान राखणे ही माझी सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. विरोधकांनी भाषणातील काही शब्द संदर्भापासून तोडून-मोडून सोशल मीडियावर टाकल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जनतेने संपूर्ण भाषण ऐकूनच मत व्यक्त करावे, अर्धवट व कापलेल्या क्लिप्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत चौधरी म्हणाले की, ते कोणत्याही प्रकारच्या द्वेषमूलक, महिलांचा अनादर करणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विधानांचे समर्थन करत नाहीत. अमळनेर शहरातील सामाजिक सलोखा, शांतता व विकास हाच आपला मार्ग असून अमळनेरकर जनतेवर असलेला विश्वास अढळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.