अंबरनाथ नगरसेवक पालिका निवडणूक लेखा जोखा -4
सागेसोयरे झाले उदंड! घरभेदीच
ठरतील पराभवाचे शिल्पकार!
माझ्या उल्हासनगर शहरला लागूनच असलेली अंबरनाथ नगरपालिका. विधानसभा निवडणुकीत उल्हासनग्सर पूर्वेकडील बहुतांश भाग अंबरनाथ विधानसभा मतदार संघात येतो. त्यामुळे या निवडणुकीत मी अंबरनाथ नगरपालिकेचा आढावा घेत आहे. माझे सर्वच पक्षीयांशी चांगले संबंध आहेत.त्यामुळे निष्पक्षपणे लिहिताना दडपण येते. तरी मी माझा पत्रकारिता धर्म निभावताना कोणतेही दडपण वा आडपडदा ठेवत नाही. कारण अश्याच वेळी पत्रकारितेचा कस लागतो व सत्वपरीक्षा असते.
अंबरनाथ नगर पालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ जवळ येत आहे. प्रचारासाठी आजपासून फक्त सहा दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षांची लगबग व धडपड वाढत चालली आहे.
अंबरनाथ नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा व मनसे एकत्र निवडणूक लढवीत असून उबाठा 25 तर मनसे 11 जागी मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी ऐनवेळी घात करून उमेदवारी मागे घेतल्याने 2 जागांवर नामुष्की ओढवली आहे. संघजा भुजंग मेश्राम व चंदा रामभाऊ पगारे यांनी रितसर पक्षाचे AB फॉर्म घेऊन नंतर नामांकन अर्ज मागे घेऊन अवसानघातकीपणा केला आहे. या मागे दहशत आहे की आर्थिक व्यवहार? याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे प्रबळ अश्या भाजपच्या पाच उमेदवारांचे नामांकन छाननीत बाद झाल्याने त्यांचे ५९ ऐवजी ५४ उमेदवारच रिंगणात आहेत. शिंदे सेनेचे मात्र ५८ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस चे ४५, राष्ट्रवादी अजित पवार यांचे २६ तर शरद पवार गटाचे ५ उमेदवार आहेत. शिवाय वंचितचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.
चार जोडपी रिंगणात
या निवडणुकीत पती पत्नीची चार जोडपी निवडणूक लढवीत आहेत. शिंदे सेनेचे मनसेतून आयात केलेले कुणाल भोईर व त्यांची पत्नी अपर्णा भोईर, मूळ शिवसेनेचे उल्हासनगर महापालिकेतील माजी नगरसेवक सेवक पंढरी वारिंगे व त्यांची पत्नी पूनम वारिंगे तसेच प्रदीप पाटील व त्यांची पत्नी नूतन पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांचा मुलगा सचिन व सून अश्विनी पाटील हे दांपत्य निवडणूक लढवीत आहेत.
नातेवाईकांचाही भरणा
या निवडणूकित सर्वच राजकीय पक्षांनी सग्यासोयऱ्यांची सोय केलेली दिसते. तळागाळातले कार्यकर्ते बाजूला सारत सग्यासोयऱ्यांणा झुकते माप दिले आहे. शिंदे सेनेचे शहर अध्यक्ष अरविंद वाळेकर यांची पत्नी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असून त्यांचा सुपुत्र निखिल व भाऊ राजू वाळेकर हे निवडणूक लढवीत आहेत.
भाजपने देखील एकेकाळचे शिंदे सेना /आमदार समर्थक पवन वाळेकर व त्यांच्या मातोश्री मीना वाळेकर यांना आयात करून वाळेकर कुटुंबाची घरफोडी करून त्यांना उमेदवारी दिली आहे.
करुणा रसाळ व त्यांचा मुलगा रोहन रसाळ, कुणाल भोईर व त्यांची पत्नी अपर्णा भोईर, भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांची सून तेजश्री करंजुले, पुत्र अभिजीत व अल्पना करंजुले निवडणूक लढवीत आहेत. काँगेसच्या नूतन पाटील या थेट नगराध्यक्ष पदासाठी तर प्रदीप पाटील व विपुल पाटील हे नगरसेवकाची निवडणूक लढवीत आहेत. सदाशिव पाटील यांचा मुलगा सचिन पाटील व सून अश्विनी पाटील थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे अंबरनाथ मध्ये वाळेकर, करंजुले व दोन पाटील यांच्या सग्यासोयऱ्यांची राजकीय सोय झाली झाली असल्याने त्यांचाच भरणा दिसतो.
या गदारोळात ३४ अपक्षही आपापले नशीब अजमावत आहेत. त्यातील दोघा- तिघांना उबाठा सेना व भाजपने पुरस्कृत केले आहे. उबाठा शिव सेनेने मात्र घराणेशाहीला थारा दिलेला दिसत नाही. एकमात्र अंजली राऊत या महिला जिल्हा संघटक नगराध्यक्ष पदासाठी असून पूर्ण ५९ जागी उमेदवारही मिळू शकलेले नाहीत. मनसे ११ व उबाठा शिव सेना २५ असे ३६ उमेदवार असून २३ जागी उमेदवारचे नाहीत. याचा फटका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास बसू शकतो.
सत्ताधारी भाजपा, शिंदे सेना, व अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. यात त्यांना मत विभाजनाचा फटका अनेक जागी बसू शकतो, त्याचा परिणाम संख्याबळावर होईल. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थेट मतदारच निवड करणार असल्याने वाळेकर, करंजुले व राऊत अशी तिरंगी लढत रंगणार आहे. त्यात वाळेकर व करंजुले हे बाहुबली झुन्जणार आहेत. ही साठमारी लक्षणीय व प्रेक्षणीय असेल.
असे असले तरी निवडणुकी नंतर शिंदे सेना, भाजपा व अजित पवार राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेचा मलिदा फस्त करतील असेच वातावरण सद्या तरी दिसत आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470