शिक्षण, कौशल्य, अभ्यास आणि ज्ञान जीवनाचे खरे मंत्र : धीरजकुमार वाघूलदे यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
अमळनेर : विक्की जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) मध्ये ‘माझे जीवन, माझे शिक्षण’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक धीरजकुमार वाघूलदे यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या मूलमंत्रांवर सखोल मार्गदर्शन केले. जीवनातील मूल्ये, कुटुंबाची भूमिका, कौशल्य विकासाचे महत्त्व, प्रशिक्षणातील सहभाग आणि करिअर नियोजनापासून ते आरोग्य, चिंतन आणि स्व-अनुशासनापर्यंत विविध अंगांनी त्यांनी विद्यार्थ्यांना समृद्ध विचार दिले. “शिक्षण + कौशल्य + अभ्यास + ज्ञान = यशस्वी जीवनाचा मंत्र” असे सांगत त्यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी हीच आपल्या प्रगतीची खरी साधने असल्याचे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या प्रारंभी बिरसा मुंडा जयंती आणि विनोबा भावे स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांच्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांनी योग्य दिशा, मजबूत आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्यात आले. या प्रेरणादायी कार्यक्रमाला सिनेट सदस्य, विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करिअर कौन्सिलिंग सेंटर, RUSA, IQAC यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.