उडून गेलेल्या पाखरांचा ३५ वर्षांनंतर पुन्हा रंगणार प्रताप हायस्कूल च्या मातीत स्नेहमेळा. असंख्य माजी विद्यार्थी येणार एकाच छताखाली!
अमळनेर : पत्रकार विक्की जाधव.
काळाच्या ओघात आठवणी धुसर झाल्या असल्या तरी ‘प्रताप हायस्कूल’ चा गंध अजूनही माजी विद्यार्थ्यांच्या मनात ताजा आहे. त्या आठवणींनाच पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी २५ ऑक्टोबर रोजी ‘पुन्हा तीच शाळा, पुन्हा तेच विद्यार्थी’ या भावस्पर्शी संकल्पनेखाली प्रताप हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. १९९० ते २०२४ दरम्यान शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा हा सोहळा भूतकाळ आणि वर्तमान यांचा सेतू ठरणार आहे.

या स्नेहमेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी बंद पडलेल्या या शाळेला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने सजीव करण्यात येणार आहे.

शाळेच्या दगडी भिंतींना, ओस पडलेल्या वर्गांना आणि मैदानावरील धावपळीला पुन्हा एकदा जीवंतपणा मिळणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत जुन्या शिक्षकांचा सन्मान, वर्गभेटी, पारंपरिक प्रार्थना, आठवणींचा कार्यक्रम आणि एकत्र भोजन हे सर्व वातावरणाला भावनिक रंग चढवणार आहे.

माजी विद्यार्थी समितीच्या मते, “हा फक्त स्नेहमेळावा नाही, तर आपल्या दुसऱ्या आईसारख्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.” प्रताप हायस्कूलचा हा सोहळा म्हणजे काळ उलटवून नेणारा एक भावनिक प्रवास ठरणार असून, जुन्या पिढीच्या आठवणी आणि नव्या पिढीची जाणीव एकत्र येणार आहे.