प्राथमिक शिक्षकांवर ‘ऑनलाइन ओझे’ सकाळी लिंक, दुपारी फोन; शिक्षकांचा दिवस ‘एक्सेल’मध्येच!
अमळनेर : विक्की जाधव.
“गुरु हा ज्ञानाचा स्रोत” अशी ओळख असलेल्या शिक्षकांचा दिवस आता ऑनलाइन लिंक, गूगल फॉर्म, स्क्रीनशॉट आणि एक्सेल शीटमध्ये अडकला आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांचा दिवस आता विद्यार्थ्यांपेक्षा मोबाईल, लॅपटॉप आणि अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सूचना सांभाळण्यातच जातो.

शिक्षणापेक्षा तांत्रिक कागदोपत्री कामात गुंतलेल्या शिक्षकांच्या नाराजीला आता उघडपणे वाट मिळत आहे. दररोज सकाळी शाळेच्या आधी विविध लिंक भरायच्या, दुपारी फोनवर आकडे सांगायचे, आणि संध्याकाळी एक्सेल शीट अपडेट करायची — या चक्रात शिक्षकांचे अध्यापन मागे पडत चालले आहे. विद्यार्थी विकास, शाळेतील शैक्षणिक उपक्रम यापेक्षा अधिक वेळ आता ‘ऑनलाइन रिपोर्टिंग’मध्ये खर्च होतो, अशी खंत शिक्षक व्यक्त करत आहेत.
“ऑनलाइन सुविधा शिक्षणासाठी आली खरी, पण आता ती शिक्षणाच्या मूळ आत्म्यावरच ओझं बनली आहे,”
असं एका शिक्षकाने सांगितलं. शाळा डिजिटल होत असताना शिक्षक मात्र डेटाच्या जंगलात हरवले आहेत. ज्ञान देण्याचा आनंद ‘एक्सेल’च्या चौकटीत बंदिस्त झाला आहे आणि म्हणूनच आज शिक्षकांचा दिवस खऱ्या अर्थाने ‘डिजिटल ओझ्याचा दिवस’ ठरत आहे.