अमळनेर भावसार समाजाचा एकता व श्रद्धेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर भावसार समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली नवरात्र उत्सवाची परंपरा यंदाही भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उत्सवाच्या प्रारंभी झालेल्या जनरल सभेत अखंड नंदादीप, फुलहार, आरती, प्रसाद व अष्टमी हवन पूजेचा लिलाव पार पडला. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून लिलावात सहभागी झाले आणि मान मिळवण्याची उत्सुकता व्यक्त केली. या लिलावातून जमा झालेल्या निधीतून नवरात्र उत्सव तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

घटस्थापनेनंतर दररोज रात्री ९.३० वाजता समाजाचे संत श्री खुशालदास महाराज लिखित गरब्यांचे गायन होत असून, त्यात समाजबांधव मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. त्यानंतर आरती व प्रसाद वितरणाने वातावरण अधिक मंगलमय होते. दसऱ्याच्या पहाटे घट विसर्जनानंतर भावसार मढी येथे उपस्थित बांधवांचा सत्कार करून उत्सवाची सांगता केली जाते.
भावसार समाजाचा हा नवरात्रोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून समाज एकतेचा, परंपरेच्या जतनाचा आणि भाविकतेच्या साक्षीचा उत्सव ठरला आहे. या यशस्वी आयोजनात कार्यकारी मंडळ व सर्व समाजबांधवांचे योगदान उल्लेखनीय ठरले.