गरीबांच्या टपऱ्या उठल्या, धनदांडग्यांचे अतिक्रमण अजूनही अबाधित; सामान्य हातमजूरांमध्ये संताप
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पाच पावली मंदिर परिसरात सुरू आहे. या भागाचा विकास होण्यासाठी वेळ लागणार असला तरी, कामासाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली पालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. मात्र, या कारवाईत हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी आणि मजुरांच्या टपऱ्या, स्टॉल्स व लहानसहान व्यवसायावरच गदा आली आहे. शहरातील सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाशी जोडलेली टपरी-स्टॉल्स हटवण्यात आले, तर दुसरीकडे भल्या मोठ्या धनदांडग्यांची, राजकीय आश्रयाखालील अनधिकृत बांधकामं मात्र आजही अक्षरशः डोळ्यात भरतात. “गरीबांना हुसकावून लावण्याचं धाडस प्रशासन दाखवतं, पण धनिकांच्या अतिक्रमणांवर मौन का?” असा सवाल नागरिक सर्रास विचारू लागले आहेत.
या कारवाईमुळे हातावर पोट भरणाऱ्या कामगारांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.
रोजच्या रोज टपरीवरच्या कमाईवर मुलांचे पोट भरणारे आज रस्त्यावर बसले आहेत. यावेळी शहरातील एकाही पुढाऱ्याने या कष्टकऱ्यांच्या मदतीला न धावून येणे ही नागरिकांसाठी आणखी मोठी शोकांतिका ठरली आहे.
पालिका आणि प्रशासनाचे हे दुहेरी धोरण लोकांना अस्वस्थ करणारे आहे.
व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत करणाऱ्या या घटनांमुळे “सत्ताधाऱ्यांसाठी रखेल, तर सामान्यांसाठी मजुरांसाठी चाबूक” अशीच नागरिकांची धारणा दृढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गरिबांचे अतिक्रमण हटवताना धनदांडग्यांच्या बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई का नाही, याचे उत्तर पालिकेने द्यावे, अशी मागणी होत आहे.