शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमळनेरची रणभेरी : बच्चुभाऊ कडूंच्या सभेला उसळणार शेतकरी लाट
अमळनेर : विक्की जाधव.
“शेतकरी म्हणून मी येणारच” या प्रतिज्ञेसह जळगाव जिल्ह्यातील बळीराजा ५ ऑक्टोबर रोजी अमळनेरमध्ये हक्काच्या लढ्यासाठी एकवटणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व शेतकरी हक्कांचे पुरस्कर्ते बच्चुभाऊ कडू यांच्या जाहीर सभेसाठी हजारो शेतकरी बांधव बळीराजा स्मारक ते इंदिरा भवन हॉल परिसर गाजवणार आहेत. हेक्टरी ५० हजार रुपये मदत व शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठीची ही हाक शेतकऱ्यांच्या मनात नवा जाज्वल्य निर्धार जागवत आहे.

या सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम काका पाटील शेतकऱ्यांसमोर स्थानिक आमदार-खासदारांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा करणार आहेत. त्यांनी आणलेला निधी कुठे वापरला, कोणाला लाभ झाला आणि शेतकरी मात्र वंचित का राहिला याबाबत ते सवाल मांडणार आहेत. “राजकारण कुठलेही असो, हक्कासाठी शेतकरी एकत्र या” असा जोरदार संदेश या सभेतून दिला जाणार आहे. बच्चुभाऊ कडू सर्वप्रथम बळीराजा स्मारकाला अभिवादन करून थेट इंदिरा भवन येथे पोहोचतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. शेतकऱ्यांना मिळत नसलेला हमीभाव, शासनाची उदासीनता आणि शेतीमालाचे खच्चीकरण यावर ते सरकारला झोपेतून उठवणारे परखड भाषण करणार आहेत. या सभेच्या माध्यमातून अमळनेर तालुका शेतकरी आंदोलनाचा नवा गड ठरणार, असा विश्वास आयोजक संतोष पाटील यांनी व्यक्त केला.