न्यू प्लॉट येथील महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळात सामूहिक महाआरतीने अष्टमी उत्सव उजळला
अमळनेर : विक्की जाधव.
परंपरेप्रमाणे यंदाही न्यू प्लॉट येथील महाराणा प्रताप नवरात्र महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दि. ३० सप्टेंबर रोजी अष्टमी निमित्त आयोजित कार्यक्रमाला परिसरातील महिला व कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या विशेष दिवशी मंडळातर्फे सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महिला सदस्यांसह जेष्ठ सभासदांनीही सामूहिक स्वरात देवीची आरती करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. कुटुंबियांसह सहभागी होत भाविकांनी उत्सव अधिक रंगतदार केला.
नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकता, महिलांचा सहभाग आणि भक्तिभाव यांचे दर्शन घडले. महिला मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून टिकवलेली ही परंपरा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थित भाविकांनी व्यक्त केले.