वासरे व कळमसरे पूरग्रस्तांना शेल्टर कम हायजीन किट्स वाटप
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील वासरे व कळमसरे या गावांमध्ये मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीत अनेकांचे घरांचे नुकसान झाले, तर काही घरात पाणी शिरल्याने धान्य, भांडीकुंडी वाहून गेले. अनेक कुटुंबांना शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला होता. या कठीण प्रसंगात नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (कार्ड) जालना आणि साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांनी पुढाकार घेतला.

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना शेल्टर कम हायजीन किट्सचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये मोठी व लहान ताडपत्री, मच्छरदाणी, अंग धुण्याचा साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, दोरी, बॅग अशा दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे पीडित कुटुंबांना तात्पुरता आधार मिळाला असून त्यांच्या जगण्याला थोडा दिलासा मिळाला आहे. किट वितरणावेळी साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कळमसरेचे उपसरपंच जितेंद्र राजपूत, तलाठी भूषण पाटील, मुकेश देसले, वासरे गावचे रोहिदास पाटील व दिनेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमात फाउंडेशनचे कार्यकर्ते शरद पाटील, संदीप धाकड आणि सचिन मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. सामाजिक ऐक्य आणि संवेदनशीलतेचा हा उपक्रम पूरग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरला.