मुंदडा माध्यमिक विद्यालय येथे आरोग्य जनजागृती शिबीर संपन्न.
अमळनेर : विक्की जाधव.
मुंदडा माध्यमिक विद्यालय, माळीवाडा येथे 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई, जळगाव जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य जनजागृती व IEC activity कॅम्पिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रविकास संस्थेच्या डॉ. प्रिया पटेल यांनी ‘आपले आरोग्य कसे चांगले ठेवावे व आजारांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे’ याविषयी मार्गदर्शन केले. स्थलांतरीत प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल सूर्यवंशी यांनी एचआयव्ही व टीबी या आजारांविषयी माहिती देत त्यावर मोफत उपचार ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच समाजातील अशा रुग्णांशी आदराने व संवेदनशीलतेने वागावे, त्यांना आधार द्यावा असे आवाहनही केले. या वेळी आयसीटीसी अमळनेरचे समुपदेशक अश्वमेध पाटील यांनी एचआयव्ही व एड्स यातील फरक, त्याची लक्षणे आणि किशोरवयीन मुलामुलींनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. कॅन्सर सारख्या गंभीर आजारांविषयीही विद्यार्थ्यांना जागरूक केले गेले. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नेहा पाटील, शिक्षकवर्ग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे तसेच राष्ट्रविकास संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी ओआरडब्ल्यू हिलाल पाटील यांनी शिक्षक, विद्यार्थी व सर्व मान्यवरांचे आभार मानले.