महावितरणाचा निष्काळजीपणा – धोकादायक काम करताना बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्याच्या बेतली जीवावर!
अमळनेर : विकी जाधव
१ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेत महावितरणच्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्याचा जीव स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वाचला. डीपीवर डिओ काढताना अचानक विजेचा शॉक बसल्याने दिनेश गुलाब चौधरी (रा. जळोद) डीपीवर चिकटला. मात्र गावातील दीपक पांडुरंग पाटील यांनी तत्परतेने कळमसरे वीज केंद्राशी संपर्क साधत वीजपुरवठा खंडित करून मोठा अनर्थ टाळला. स्थानिकांनी तातडीने चौधरी याला खाली उतरवून दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. महावितरण बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडून धोकादायक काम करून घेत असताना अधिकृत कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती का? कोणतेही सेफ्टी नियम न पाळता असे जीवघेणे प्रयोग कशासाठी? हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.ग्रामीण भागासह शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून झाड छाटणी, लाईन तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात भर पावसाळ्यातच लाईनवर काम केले जाते आणि यामुळेच अशा अपघाती घटना घडतात. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी न केल्याने तारांवर फांद्या अडकतात, ओल्या हवामानामुळे शॉर्टसर्किटचा धोका वाढतो आणि अखेरीस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.
गावकऱ्यांचे मत आहे की, महावितरणाच्या कर्मचाऱ्यानी जर काळजीने आणि ग्रुप मिळून कामे केली असती तर आजचा प्रकार घडला नसता. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धोकादायक ठिकाणे अधोरेखित करून योग्य ती कारवाई केली पाहिजे. अन्यथा “उत्सव काळात अंधार – आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारी कामे” असे चित्र कायम राहणार, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.