अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घाणीचं साम्राज्य – रुग्ण म्हणतात, “उपचार घ्यायला जावं की आजार!”
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील हजारो लोकांसाठी जीवनदायिनी मानलं जाणारं ग्रामीण रुग्णालय आज स्वतः मृत्युदूत ठरतंय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघात, डेंगू-मलेरिया, साप-विंचू चावा, प्रसूतिसारख्या तातडीच्या वेळी नागरिकांचा पहिला पर्याय हेच रुग्णालय असतो. पण सध्या या रुग्णालयात प्रवेश केला की उपचाराऐवजी आधी घाणीचा विळखा रुग्णांना त्रास देतो.
रुग्णालयाच्या कॉरिडॉरपासून वॉर्डपर्यंत घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेने थैमान घातलं आहे. खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा जीव अक्षरशः धोक्यात आहे. “आजार बरा होईल की अजून नवा आजार घेऊन जाऊ, असं वाटतंय” अशी हतबल प्रतिक्रिया रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहे.

प्रतिक्रिया :
याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर जी. एम. पाटील म्हणाले, “सध्या रुग्णालयाच्या वर सुरू असलेल्या कामामुळे घाण होते आहे. कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सांगूनही तो दुर्लक्ष करतो. तर कर्मचारी पगार मिळत नसल्याने कामात टाळाटाळ करतात. मी स्वतःही कंटाळलो आहे, कारण हा माझ्याकडे आलेला एक्स्ट्रा चार्ज आहे.” इतकंच नव्हे तर काही स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यकर्ते रात्री नशेत येणारे काही जण कर्मचाऱ्यांना त्रास देतात, असंही त्यांनी कबूल केलं. कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सहा-सहा महिन्यांचे पगार थकलेले आहेत. १०२ अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचाही चार महिन्यांपासून पगार नाही. मग अशा परिस्थितीत कर्मचारी कामाला टाळाटाळ करतात. पण या सर्वांचा फटका बसतो तो थेट रुग्णांना. तालुक्याच्या मध्यवर्ती रुग्णालयात अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील छोट्या आरोग्य केंद्रांबाबत बोलायलाच नको!

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात “आपला दवाखाना” योजना सुरू केली तिथही अशीच परिस्थिती..
एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात “आपला दवाखाना” योजना सुरू करतंय. पण प्रत्यक्षात तेथे डॉक्टर उपलब्ध नसणे, औषधांचा तुटवडा, कर्मचारी अनुपस्थित असणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकांना तर आपल्या परिसरात आपला दवाखाना कुठे आहे हेही ठाऊक नाही. मग लोकांचा प्रश्न एकच — शासन खरंच आरोग्यसेवा पुरवतेय की फक्त जाहिरातबाजी करतेय? तालुक्याच्या जनतेचा विश्वासच आता डळमळीत झालाय. “रुग्णालयात उपचारासाठी गेलं की जीव वाचतो की धोक्यात जातो, हेच कळेनासं झालंय” अशी नागरिकांची हतबलता स्पष्ट दिसते.