लाडकी बहीण योजनेसदंर्भात नवी अपडेट अर्जांची आता पडताळणी सुरू काहींचे अर्ज होणार बाद?
अमळनेर : विक्की जाधव
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवातही झाली. जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे दरमहा 1500 च्या हिशोबाने 7500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले.
या योजनेचा महायुतीलाही मोठा फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहीणींनी मोठ्या संख्येने मतदान केल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार घेतला तर, मात्र आता लाडकी बहीण योजनेसदंर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जे अर्ज दाखल करण्यात आले त्या अर्जांची आता पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरतानाच एक हमीपत्र लिहून दिले होते. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, कुटुंबातील सदस्य आयकर भरत नाही, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही, कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही, असे हमीपत्रात लिहून देण्यात आलं होतं. आता त्याच हमीपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. यामुळे लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढू शकते.