देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. आणि तें पुन्हा आले..
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव
महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आणि त्यातही भाजपला बहुमताच्या जवळ जाणारा आकडा प्राप्त झाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचं घोंगडं तब्बल दहा दिवस भिजत पडलं होतं.
त्यामुळे या दहा दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या तर्क-वितर्कांना उधाण आलं. एका बाजूला एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याची तर दुसऱ्या बाजूला भाजपमधून देवेंद्र फडणवीस वगळता इतर नावांचा विचार केला जात असल्याची चर्चा सुरु झाली. जर भाजपला जर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं तर मग याबाबतची घोषणा करण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा वेळ का घेतला?
नव्या चेहऱ्याचा राजकीय प्रयोग न करता, देवेंद्र फडणवीस यांनाच ‘पुन्हा’ मुख्यमंत्री करण्याचा निर्णयामागे भाजपची नेमकी गणितं काय आहेत
‘मी पुन्हा येईन’…
ढोबळमानाने या दहा दिवसांमध्ये काय घडलं, याचा विचार केला तर दोन गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात.
एक म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याची चर्चा, त्यांनी फोटोमध्ये स्मितहास्यही न देणं ते गावी गेल्यानंतर आजारी पडणं, यामधून एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्याची चर्चा अधिक प्रभावी ठरली.
दुसऱ्या बाजूला, भाजपमधून मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र चव्हाण अशा नव्या चेहऱ्यांच्या नावाचीही चर्चा होऊ लागली. अर्थात, या वावड्या असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं असलं तरीही या सगळ्यात ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेतून काहीसं मागे गेल्याच दिसू लागलं.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला होता. यासाठी जबाबदार देवेंद्र फडणवीसांना ठरवण्यात आलं. आता फडणवीसांना दिल्लीत पाठवलं जाईल, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशा स्वरुपाच्या चर्चा सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी संघाची आणि भाजप आमदारांची इच्छा असली तरीही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं की नवा चेहरा द्यायचा, हा भाजपाचा प्रश्न होता. तिसरी गोष्ट अशी की, महायुतीला मिळालेला प्रचंड कौल हा ओबीसी आणि मराठा मतांमुळे मिळालेला असल्यामुळे एखाद्या ओबीसी अथवा मराठा नेत्याला मुख्यमंत्री करावं का, याचीही चाचपणी वरिष्ठ नेतृत्वाकडून केली जात होती, परंतु “देवेंद्र फडणवीसांची पक्षावरची जी पकड आहे, ती इतर कोणत्याही नेत्याची नाही. इतर राज्यांमध्ये भाजपने जसा नवीन चेहऱ्याचा प्रयोग केला, तसा प्रयोग करणं इथे भाजपला शक्य नव्हतं. फडणवीस वगळता महाराष्ट्र भाजपमध्ये चेहराच दिसून येत नाही, जो भाजपचं नेतृत्व करू शकेल.” म्हणुन फडणवीस हे मुख्यमंत्री होत आहेत.