सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा
धुळे – सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. याबाबत शहानिशा केल्यावर ती अफवा असून फेक न्यूज व्हायरल करून चुकीची माहिती समाजात पसरवली जात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर यांनी दिली.
सोशल मीडियावर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळपासून धुळे ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान मतदान केंद्रावर शून्य मते मिळाली असून त्या जोडीला एक फेक व्हीडीओ क्लिपचा वापर करून शून्य मते मिळाल्याने आंदोलन सुरू असल्याचे भासविण्यात येत आहे.
धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात अवधान येथे २४७, २४८, २४९, २५० ही चार मतदान केंद्र आहे. यातील मतदान आकडेवारीनुसार मतदान केंद्र क्र. २४७ वर काँग्रेस उमेदवारास २२७, मतदान केंद्र क्र. २४८ वर २३४, मतदान केंद्र क्र. २४९ वर २५२, मतदान केंद्र क्र. २५० वर ३४४ मते मिळाली आहे.
अवधानच्या चार मतदान केंद्रावर नोटासह २ हजार ८८१ मतदान झाले. यात काँग्रेस उमेदवाराला १ हजार ५७ मते मिळाली आहे. वस्तुस्थिती पाहता अवधान मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मते मिळाली असा खोडसाळ, अफवा पसरविणारा, चुकीचा, दिशाभूल करणारा संदेश पसरविला जात आहे.
तरी नागरिकांनी अशा फेक न्यूजला, आंदोलनाच्या फेक व्हीडीओला प्रतिसाद देऊ नये व अफवा पसरू नये. तसेच असा बोगस संदेश व्हायरल करू नये, अफवांना बळी पडू नये, असे आवाहन #धुळे ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी केले आहे.