विधानसभेच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक काही खलबत उघड तरी काही झाकली..
विक्की जाधव : मार्मिक न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणूक, जागावाटप, महाविकास आघाडीच्या बैठका यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. कोण- कुठे लढणार? याबाबतही संजय राऊतांनी माहिती दिली आहे. राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर….
विधानसभेच्या जागावाटपासाठी काल महाविकास आघाडीची 10 तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता आज शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भाजप आणि विशेषत : अमित शाह यांच्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक
परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद झाला आहे. त्यानंतर आता काल 10 तास बैठक झाली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.