डिकसळ सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी सूर्यवंशी तर व्हा.चेअरमनपदी धनंजय पोंदकुले बिनविरोध
संस्थेच्या सभासदांना लाभांश मिळण्यासाठी प्रयत्न करणार
(निलेश गायकवाड)
इंदापूर:डिकसळ (ता.इंदापुर) येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्या निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.एस.कदम यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्यांची बैठकीचे शुक्रवार ( ता.४) रोजी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चेअरमन पदासाठी तानाजी जगन्नाथ सूर्यवंशी यांची निवड व्हावी अशा प्रकारची सूचना संस्थेचे संचालक तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी मांडली. त्यास उपस्थित सदस्यांनी मान्यता दिली. तदनंतर व्हा.चेअरमन पदासाठी धनंजय हरिदास पोंदकुले यांची निवड व्हावी अशा प्रकारची सूचना संस्थेचे संचालक संतोष हगारे यांनी मांडली त्यास उपस्थित सदस्यांनी मान्यता दिल्यानंतर चेअरमनपदी तानाजी जगन्नाथ सुर्यवंशी यांची व्हा. चेअरमनपदी धनंजय हरिदास पोंदकुले बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस. एस. कदम यांनी जाहीर केले. बैठकीत 13 सदस्या पैकी २ सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन सूर्यवंशी व नूतन व्हा. चेअरमन पोंदकुले यांनी सांगितले की सर्व सदस्यांना व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा नावलौकिक वाढण्यासाठी व कर्ज वसुली करून संस्थेच्या सभासदांना लाभांश देण्यासाठीआम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यानंतर उपस्थित संचालकाच्या वतीने नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव सिंकदरआत्तार व सहसचिव शरद वाघ यांनी सहकार्य केले.