शिरपूर राजपूत समाज संस्थे तर्फे सभासद नोंदणी चे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील ‘महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूर’ या राजपूत समाज संस्थेची नोंदणी माननीय धर्मादाय आयुक्त धुळे यांच्या कार्यालयाकडून झाल्यानंतर संस्थेच्या सल्लागार समितीची विशेष सभा भाऊसो. इंद्रसिंह राजपूत भवन, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली व संस्थेत जास्तीस जास्त समाज बांधवांनी सभासद होण्याचे आवाहन संस्थे तर्फे आयोजित सभेत करण्यात आले.
या सभेत संस्थेचे कार्य, उद्देश, सभासद नोंदणी मोहीम, आगामी कार्यक्रम इ. माहीतीवर चर्चा करण्यात आली. संस्थेतर्फे सभासद नोंदणीचे काम समाजाच्या प्रत्येक गावोगावी/घरोघरी जाऊन करायचे उद्दिष्ट हाती घेण्यात आलेले आहे. शिरपूर शहरातील दादुसिंग कॉलनी पासून सभासद नोंदणीचे काम चालू झाले आहे.
संस्थेच्या कामकाजाचे नियोजन व चर्चा करणेकामी सोमवार दिनांक 16/09/2024 रोजी सकाळी 09:30 वा राजपूत भवन, दादूसिंग कॉलनी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी समाजबांधवांनी संस्थेकडून समाजाला असणाऱ्या अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. अनेक बांधवांनी प्रातिनिधिक स्वरूपात सूचना केल्यात. यात कल्पेशसिंग जमादार, तुमडूसिंग जमादार, रमेशसिंग जमादार, यशपाल चौधरी, जगदीश गिरासे, ऍड कुणाल राजपूत, प्रेमसिंग राजपूत, महेंद्रसिंग राजपूत यांनी आपला अभिप्राय सभेत नोंदविला.
संस्थेचे संचालक श्री जयपालसिंह गिरासे सरांनी संस्थेला करण्यात आलेल्या सर्व सूचना व अपेक्षांचे स्वागत केले. पुढे बोलतांना त्यांनी समाजाने सकारात्मक भावनेने एकत्र येणे ही चांगली सुरूवात असून येत्या काळात या संस्थेमार्फत रचनात्मक व विधायक कार्यक्रम राबविले जातील अशी ग्वाही दिली.
संस्थेचे अध्यक्ष श्री संग्रामसिंह राजपूत यांनी सभासद नोंदणी मोहीमेला सर्व गावांतून सहकार्य करा असे आवाहन करून संस्थेच्या हेतू व उद्दीष्टांवर प्रकाश टाकला. येत्या काळात “श्रीमद् भगवतगीता व क्षात्रधर्म” या विषयावर श्री रामराज्य मिशनचे अध्यक्ष कुँवर राजेंद्रसिंहजी नरूका (राजस्थान) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. त्या समारोहाला मोठया संख्येने माता-बंधु-भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली.
यावेळी समाजबांधवांनी दिलेले अभिप्राय व सूचना इतिवृत्तात नोंदविले गेलेत. यावर विश्वस्त मंडळाच्या सभेत विचार करण्यात येईल अशी ग्वाही संस्थेच्या पदाधिकारी मंडळाकडून देण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी उपस्थित सदस्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या बैठकीस संस्थेचे संचालक विविध गावांचे राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर जेष्ठ सल्लागार मंडळी, संस्थेचे सन्माननिय विश्वस्त व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.