खासदाराच्या रॅलीत गेलेली वयोवृद्ध महिला आतषबाजीने जखमी
खासदाराने सोडले रामभरोसे !
शिवसेना मिंधे गटाचे विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दि.२ मे रोजी नामांकन पत्र भरले. यावेळी गर्दी जमवण्यासाठी दोनशे रूपये व वडापावचे आमिष दाखवून महिला बचत गट तसेच महिलांना बसेस भरून डोंबिवलीला नेण्यात आले होते. उल्हासनगरच्या लालचक्की व सुभाष टेकडी परिसरातील सुमारे ५० महिलांना एका बसने डोंबिवलीला नेण्यात आले होते. त्यासाठी भाजपच्या भावी नगरसेविका म्हणवणा-या लता पगारे यांनी पुढाकार घेतला होता. याबाबतची ऑडयो क्लिप त्याच दिवशी वायरल झाली होती.
याच बसमधुन श्रीमती अन्नपुर्णा शे. शिरसाट या वयोवृद्ध गरजू महिलाही गेली होती. सकाळी ८ पासून दुपारी २ पर्यंत ताटकळत ठेऊन या महिलांना एक पाण्याची बाटली व वडापाववर रॅलित भाग घेण्यास भाग पाडले होते. ही एक प्रकारे गरीब गरजू महिलांची क्रूर थट्टाच होती. दोनशे रुपयात या महिलांना सुमारे ६ तास उन्हातान्हात राबवून घेतले होते.
विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नामांकन पत्र भरण्यास कूच करीत होते. सोबत आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार कुमार ऐलानी, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी नेते या राजपुत्राचे नामांकन सादर करण्यास जात असताना फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यावेळी गर्दीत असलेल्या श्रीमती अन्नपुर्णा शिरसाट यांच्या पायाजवळ फटाक्याचा स्फोट झाल्याने त्यांच्या नायलॉनच्या साडीने व परकराने पेट घेतला त्यात त्यांचा पाय व पार्श्वभाग भाजला. सोबत आलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखत पेटलेली साडी विझवली. मात्र ज्यांनी या वयोवृद्ध महिलेवर उपचार करण्याऐवजी घरी पोहचवून हात झटकून दिले. या प्रकरणाचा गवगवा झाला तर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊन खासदाराची बदनामी होईल म्हणून सर्वजण नामानिराळे झाले. दर्यान या महिलेची आर्थिक परिस्थिती कमुवत असूनही त्यांच्या मुलाने व सुनेने खाजगी रूग्णालयात उपचारावर ८ हजार रूपये खर्च केले. अखेर अधिक खर्च परवडत नसल्याने त्यांना शासकिय मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळतीच ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर, उपसंघटक डॉ. जानू मानकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे अॅड. उल्हास मोरे, युवा नेते अनिकेत गायकवाड यांनी मध्यवर्ती रूग्णालयात मध्यरात्री धाव घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची शाश्वती दिली. पोलीसांनीही एक आठवड्यानंतर त्यांचा जबाब घेऊन एमएलसीची नोंद केली.
याबाबतची माहिती कळताच मिंधे गटाचे काही लोक खडबडून जागे झाले व हे प्रकरण दडपून याचा बोभाटा होऊ नये यासाठी धडपडू लागले. नंतर त्या वयोवृद्ध महिलेस तब्बल आठ दिवसानंतर खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे.
ज्या मतदारांच्या मतांवर निवडणूक जिंकायची त्याच मतदारांना दोनशे या अल्प पैश्यात ६-६ तास राबवून घ्यायचे व आपल्या आजीच्या वयाच्या महिलेस जखमी अवस्थेत रामभरोसे सोडून द्यायचे हा प्रकार निंदनीय गुन्हा असून आचार संहितेचा भंग व मानवतेला कलंकित करणारा प्रकार आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी डॉ.जानू मानकर, दिलीप मालवणकर व अॅड. उल्हास ( बंटी) मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.