मार्मिक प्रतिनिधी (मनोज चित्ते) :- माढा लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. भाजपातील सुप्त संघर्षातून व अंतर्गत कुरघोडीमुळे मोहिते पाटलांची उमेदवारी कापली गेली व पहिल्याच यादीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेल्या मोहिते पाटील परिवाराने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवली. ज्या मोहिते पाटील परिवाराने भाजप मध्ये प्रवेश करताच एक आमदार व एक खासदार दिला (ज्या उमेदवारांचा मतदार संघाशी काडीमात्र संबध नव्हता) अशांना अल्पावधीत विजयी केले. मोहिते पाटील यांना २०२४ च्या लोकसभेची उमेदवारी हवी होती त्यांना भाजपने विधान परिषदेवर घेत बोळवण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने मात्र संयम बाळगत दिल्ली गाठत २०२४ ची लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी जंग जंग पछाडले. परंतु भाजप श्रेष्ठीनी मोहिते पाटील यांना डावलून पुन्हा निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आपला राजकीय स्वाभिमानी बाणा दाखवित तुतारी हाती घेण्याचे धाडस दाखविले. भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश करणे संपूर्ण भारतात धोक्याचे समजले जाते अशा दबावाच्या राजकारणाला बळी न पडता तुतारी हाती घेत ऐतिहासिक निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद फक्त माढा लोकसभेमध्ये न उमटता कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह इतरही मतदार संघात उमटले.
सध्या माढा लोकसभे मध्ये भाजपच्या निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीची लढत होईल असे बोलले जात होते. परंतु निंबाळकर यांच्या अपुऱ्या प्रचार यंत्रणेमुळे व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी निंबाळकर यांची पिछेहाट होताना दिसत आहे तर शरदचंद्र पवार यांच्या मूळ राष्ट्रवादीची विभागणी झाल्यानंतरही शरद पवार यांनी हार न मनता नव्या उमेदीने जुन्या नव्यांची सांगड घालत मतदार संघ पिंजून काढत असल्याने नागरिकांची सहानुभूती मोहिते पाटील यांना मिळताना दिसत आहे.
मोहिते पाटील यांचे पारडे जड होताना दिसत असल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सभेनंतर तरी मतदार मोहिते पाटील यांच्यावरील सहानुभूती सोडून निंबाळकर यांच्या पारड्यात मत देऊन भाजपाच्या मताधिक्यात वाढ होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सर्व अंदाज फोल ठरवित मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. निंबाळकर यांच्या सोबत विद्यमान लोकप्रतिनिधी असतानाही लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते व जनता मात्र *रामकृष्णहरी वाजवा तुतारी* ही नवीन घोषणा ठिकठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच निंबाळकर यांचा प्रवास खडतर होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.