अखिल भारतीय धोबी महासंघचे राष्ट्रीय अध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
नाशिक, दि. १० ऑगस्ट : अखिल भारतीय धोबी महासंघच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कृष्णकुमार कनोजिया यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे रविवारी (१० ऑगस्ट) झालेल्या महासंघाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे आणि महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश संघटक अरुण धोबी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांचा शाल, फुलमाला आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.बैठकीला अखिल भारतीय धोबी महासंघचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्रशेठ आहेर, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, प्रदेश संघटक अरुण धोबी यांच्यासह देशभरातील विविध राज्यांतील लोकसभा निहाय सुमारे ३०० ते ३५० समाजप्रमुख नेते उपस्थित होते.कृष्णकुमार कनोजिया यांची यापूर्वी पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे पहिल्यांदा बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर नाशिक येथे दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदाही ते निर्विरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले आहेत.या निवडीमुळे धोबी समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी पुढील काळात अधिक प्रभावी काम करता येईल, अशी अपेक्षा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
