ध्येय, प्रामाणिक प्रयत्न व आत्मविश्वास हेच यशाचे त्रिसूत्र प्राचार्य डॉ. रविंद्र सोनवणे
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पं. छ. भांडारकर व रा. का. काले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘RxVibez-2026’ या स्वागत समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रविंद्र सोनवणे यांनी स्वामी विवेकानंद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व रतन टाटा यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण मेहनत व आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. संघर्षातूनच यश घडते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत आपला परिचय करून दिला. प्रा. अनिल बोरसे, प्रा. देवेश भावसार, प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांचा जल्लोष, स्नेहभोजन व सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला.
यावेळी तज्ज्ञ परीक्षकांनी ‘RxVibez-2026’ सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करून प्राचार्यांच्या हस्ते मुकुट प्रदान करत गौरव केला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वार्षिक परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, जीपॅट परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुयोग्य संचलन प्रा. शिवानी शर्मा व विद्यार्थ्यांनी केले, तर आभार प्रा. छाया महाजन यांनी मानले. शेवटी ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.