आता जनता ठरवेल घराणेशाहीला अन “दादागिरीलां संपवायचीच!”
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषद निवडणूक 2025 तोंडावर असताना बऱ्याच प्रभागात एकच खदखद उसळली आहे प्रस्थापित आणि घराणेशाहीचा कंटाळा! १५ ते २५ वर्षे सत्तेवर बसूनही सामान्यांच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. “निवडणूक जिंकून स्वतःचेच घर भरले, प्रभाग मात्र अंधारातच!” असे जनतेतून बोलले जात आहे.
सत्तेत बसूनही रस्ते, पाणी, नाले, स्वच्छता, शिक्षण यावर ठोस काम न करणाऱ्यांच्या सत्ता-लालसेच्या वृत्तीने लोक संतप्त झाले आहेत. गरीब आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांचा केवळ मतासाठी वापर केला जातो, ही भावना जनतेत तीव्र झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत “दादागिरी जिरवायची” असा निर्धार मतदारांनी पक्का केला आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर साठी “आता नवे नेतृत्व हवे… निस्वार्थी, स्वच्छ आणि समाजासाठी झटणारे!” मुलांच्या शिक्षणासाठी, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी, आणि गरीबांच्या कल्याणासाठी लढणारा सर्वसामान्यांचा उमेदवार तो ही उच्च शिक्षित यावेळी पुढे यावा, अशी चर्चा प्रत्येक गल्लीमध्ये सुरू आहे. घराणेशाहीला सडेतोड उत्तर देण्यासाठी लोक सर्वसामान्य, प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसत आहेत.