अमळनेरने गमावला सहकार क्षेत्रातील सज्जन नेता बापूसाहेब प्रभाकर कोठावदे यांचे निधन.
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेरच्या सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक तेजस्वी नाव आज लुप्त झाले. मा. नगरसेवक, अर्बन बँक आणि खा.शि. मंडळाचे माजी चेअरमन लाडशाखीय व पंच मंडळ, तसेच भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर अध्यक्ष म्हणून समाजसेवा आणि सहकार कार्यात आपला ठसा उमटवला. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, साधेपणा आणि माणुसकी या मूल्यांवर आधारित त्यांच्या नेतृत्वाने असंख्य कार्यकर्त्यांना दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय, सन्मान आणि विकासाचे बळ दिले. अश्या आदरणीय बापूसाहेब प्रभाकर शंकर कोठावदे यांचे आज सकाळी अल्पशा आजारानंतर निधन झाले. एक सज्जन, प्रामाणिक आणि लोकहितैषी व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, या बातमीने शहरातील जनमानसात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना तीन भाऊ होते तर बापू हे दोन नंबर असून त्यांना दोन बहिणीही होत्या, दोन मुलं पत्नी आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार होता.
बापूसाहेबांचे आयुष्य हे सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या मूल्यांनी ओतप्रोत भरलेले होते. सहकार क्षेत्रात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्बन बँक असो, खा.शि. मंडळ असो वा मंगलमुर्ती पतसंस्था त्यांनी प्रत्येक ठिकाणी पारदर्शक आणि लोकहिताचा दृष्टिकोन ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी समाजकारणात आणि सहकारात आपला मार्ग शोधला.
आज बापूसाहेबांच्या जाण्याने अमळनेरने एक खंबीर स्तंभ गमावला आहे. त्यांच्या स्मितभाषी व निर्णयातील न्यायबुद्धी आणि वागण्यातली साधेपणा हे गुण अनेकांच्या मनात कायम जिवंत राहतील. त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास अमळनेरच्या प्रत्येक गल्लीमध्ये दरवळत राहील कारण बापू गेले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहेत.
भावपुर्ण श्रद्धांजली..
लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ अमळनेर. माऊली मित्र मंडळ. मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. खानदेश शिक्षण मंडळ. जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशन. स्वामी विवेकानंद मित्र मंडळ. समस्त अमळनेर मित्रपरिवार.