अमळनेर ते भद्रा मारुती पायी दिंडी – भक्ती, पर्यावरण आणि एकोप्याचा उत्स
अमळनेर : विक्की जाधव.
पावसाळ्याच्या रिमझिम सरी, हिरवळ भरलेली रान-वनाची वाट आणि भक्तिरसात न्हालेली मनं… अशा पवित्र वातावरणात यंदाही श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ऑगस्ट, मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता विजय मारुती मंदिरातून श्री मारुतीरायाची मूर्ती रथात विराजमान करून वाद्य-बँड, भजनी मंडळ आणि भक्तिगीतांच्या स्वरात दिंडीचे प्रस्थान होणार आहे. पहिलाड मार्गे साईबाबा मंदिरातून पारोळा मार्गे निघालेली दिंडी आडगाव, कजगाव, पातोंडा, कन्नड अशा टप्प्यांवर मुक्काम घेत शेवटच्या दिवशी घृष्णेश्वर व वेरूळ लेण्या मार्गे श्रीक्षेत्र भद्रा मारुती येथे पोहोचणार आहे.

या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिन्यातील निसर्गसंपन्न मार्ग. हिरवीगार शेती, पावसाने न्हालेली झाडे आणि मंद वाऱ्याची साद, यातून भक्तांची मनं तल्लीन होतात. संपूर्ण प्रवासात भक्तीभाव, एकोपा आणि शिस्तीचे दर्शन घडते. या दिंडीत कुठलेही शुल्क नसून, सर्वांसाठी मोफत भोजन व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला विनामूल्य आणि समाधानकारक अनुभव मिळतो. दिंडीचे आयोजन प्रताप साळी, दीपक आबा आणि श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, “या पवित्र प्रवासात सहभागी होऊन हनुमानजींच्या चरणी वंदन करा आणि आपल्या मनोकामना पूर्णत्वास न्या.” भद्रा मारुतीच्या दर्शनाने भक्तांचे मन प्रसन्न होत असून, हा आध्यात्मिक प्रवास वर्षभर ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत ठरत असल्याचे भाविक सांगतात.