गद्दारांची उमेदवारीसाठी घरवापसी
आम्ही गद्दारांना डोक्यावर घेऊन नाचायचे का ?
(पटत असेल तर शेअर करा !)
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंचे युवा सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी उद्या मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
एकीकडे आम्ही गद्दारांना क्षमा नाही म्हणत दुनियाभरची दुष्मनी घ्यायची व ज्यांनी गेली अडिच वर्षे गद्दारनाथ एकनाथला साथ दिली, निष्ठावंत शिवसैनिकांचे खच्चीकरण केले, त्या शिंदेनिष्ठ दिपेश पुंडलिक म्हात्रे यांना उद्या वाजत गाजत पक्ष प्रवेश दिला जाणार ! ही बातमी ऐकून आमच्या पायाखालची वाळूच घसरली !
दिपेशचे पिताश्री पुंडलिकशेठ म्हात्रे हे कॉन्ग्रेसमधे होते तेव्हा पासून (१९८६)आमची ओळख. त्यापुर्वीचा इतिहासही डोंबिवलीकरांना ठाऊक आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेत ते शिवसेना विरोधक म्हणूनच वावरले.
महापौर पदही भुषवले. नंतर त्यांचे पुत्र शिवसेनेत येताच पायघड्या घालून मोठे पद दिले. गद्दारनाथ शिंदेच्या गद्दारीत तेही सामिल झाले व त्यांना राज्यस्तरीय पद मिळाले. गेली अडिच वर्षे ते शिवसेना ठाकरे गटाचे प्रखर विरोधक व मिंधेंशी एकनिष्ठ असलेले अशी ओळख आहे.
असे असताना अचानक दिपेशचे असे कोणते प्रेम उफाळून आले, कोणती उपरती झाली ? कोणता पश्चाताप झाला की, दिपेशभाऊंना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रविष्ठ होण्याची बुद्धी झाली ? त्यांना शिवसेनेत प्रवेश करायला लावणारे स्थानिक नेते कोण ? त्यामागचा त्यांचा उदात्त व पक्ष हिताचा उद्देश काय होता ?
*जेव्हा नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होत नाही तेव्हा सरोगसीने भाडोत्री मातेच्या उदरात अपत्य पोसले जाते. तसेच अशा प्रवेशांचे आहे.* आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही म्हणून काट्याने काटा काढण्यासाठी अशा परक्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन निष्ठावंतांच्या उरावर असे उपरे उमेदवार लादले जातात.अशा वेळी त्यांच्याशी संघर्ष करणा-या प्रसंगी केसेस अंगावर घेणा-या/ तुरंगवास भोगणा-यांना काय वाटत असेल ? याची तमा बाळगली जात नाही, हेच निष्ठावंतांचे दुख: आहे. परंतू सत्ता ज्वराने पछाडलेल्यांना ते दिसत नाही की कानाडोळा केला जातो ?
दिपेश म्हात्रेंशी माझे वैयक्तिक काहीच देणे घेणे, प्रेम- द्वेष नाही.मात्र अशा संधीसाधू व दलबदलूंना प्रतिष्ठा लाभणे ही चिंताजनक बाब आहे.उद्या ते शिवसेनेच्या गंगेत न्हाऊन पवित्र होतील, शिवबंधन बांधुन घेतील,पाठोपाठ डोंबिवली विधान सभेची उमेदवारीही जाहिर केली जाईल. डोंबिवलीच्या निष्ठावंतांनी त्यांचा जयजयकार करावा,खांद्यावर डोक्यावर घेऊन नाचावे,मतदार संघात निवडणुकीचा प्रचार करून निवडून आणावे,ही जबाबदारी(?)थोपवली जाईल. गद्दारांना गाडण्या ऐवजी गद्दारांना सलाम करावा, साहेब, साहेब म्हणत त्यांच्या काळ्या काचेच्या आलिशान गाड्यांमागे जावे, किती सुखद दृश्य दिसेल ना ?
दिपेश म्हात्रे हा शिवसेने वरील/ पक्ष प्रमुखांवरील प्रेम व गद्दारीने पश्चातापदग्ध होऊन आला असता तरीही आम्ही कडक जय महाराष्ट्र ठोकला असता. परंतू दुर्दैवाने तसे काहीएक झालेले नाही.
*दिपेश म्हात्रे हा डोंबिवली विधान सभा मतदार संघातून शिंदे गटातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छूक होता. परंतू डोंबिवली हा भाजपाचा पारंपारीक मतदार संघ व तेथे रविंद्र चव्हाण सारखा तगडा नेता जम बसवून ठाण मांडून बसलेला आहे. मिंधेची उपद्रवशक्ति ही -शून्य आहे. बार्गेनिग पॉवर तर अजिबात नाही. त्यामुळे शिंदे हतबल झाला आहे. मग आपलं एक प्यादं ठाकरे गटात सरकवून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न कशावरून नसेल.* दिपेश हा फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे गटातून विधान सभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आलेला संधीसाधू मिंधे समर्थक आहे.त्याला पक्ष प्रवेश देऊन लगेच उमेदवारी देणे हे राजकारण असेल तर अशा राजकारणात निष्ठावंत होरपळून निघतात, याकडे कोणी लक्ष देईल का ?
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०