शहरातील बंगाली फाईल ते अयोध्या नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील कॉलेजजवळील ओव्हरब्रिज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील बंगाली फाईल ते अयोध्या नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील कॉलेजजवळील ओव्हरब्रिज परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरत असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून लहान मुले, महिला, विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधारामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषद प्रशासनासह संबंधित विभाग आणि प्रभागातील नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून बंद पथदिवे सुरू करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.