राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेरच्या नूतन भोईचा गौरव राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा.
अमळनेर : विक्की जाधव.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या भोईवाडा येथील राष्ट्रीय खेळाडू नूतन किशोर भोई हिच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचा विशेष गौरव करण्यात येत आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नूतनने राष्ट्रीय व विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
नूतन भोई हिने १० मीटर एअर पिस्तूल शूटिंगमध्ये नाशिक विभाग पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच ६३ व्या नॅशनल इनलाईन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५मध्ये विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले. यासोबतच IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप २०२६मध्ये डेहराडून, उत्तराखंड येथे सहभागी होत आईस हॉकीमधील आपले कौशल्य सिद्ध केले. एकाच वेळी शूटिंग, इनलाईन स्केटिंग आणि आईस हॉकीसारख्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची तिची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरत आहे. ग्रामीण खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा नूतनने व्यक्त केली. ग्रामीण भागात गुणवत्ता आणि जिद्द असली तरी आर्थिक अडचणींमुळे अनेक खेळाडूंची स्वप्ने अपुरी राहतात. शासनाने ग्रामीण खेळाडूंना नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अमळनेरसारख्या शहरात आधुनिक क्रीडा संकुले उभारल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंनाही ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे आपले स्वप्न असल्याचेही नूतनने सांगितले.