मातीशी खेळून घडवा बाप्पाची मूर्ती! अमळनेरात आजपासून ‘मूर्तिकार व्हा’ कार्यशाळेला सुरुवात
अमळनेर : विक्की जाधव.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या हाताने श्री गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद नागरिकांना मिळावा, या उद्देशाने अमळनेर येथे आजपासून विशेष ‘मूर्तिकार व्हा!’ कार्यशाळेला सुरुवात होत आहे. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या आयोजनाने रविवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गलवाडे रस्त्यावरील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे ही कार्यशाळा होणार आहे.
‘मातीशी खेळून बघा! मूर्तिकार व्हा!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती निर्मितीचा अनुभव घेता येणार आहे. सहभागी होणाऱ्यांनी शाडू माती १ किलो, पाट किंवा लाकडी फळी, वाटी/प्लास्टिक डबा, रिकामी रिफिल, रद्दी वर्तमानपत्र, पेन्सिल आणि पाणी बाटली सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमुळे ‘आपला बाप्पा, आपल्या हातून’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळणार असून, मातीपासून मूर्ती घडवण्याची कला नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मातीशी नाते जोडत सर्जनशीलतेचा आनंद घ्यावा, असे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.