उघड्या गटारी, कचऱ्याचे ढीग आणि बंद दवाखान्याने पैलाडवासीय त्रस्त
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील पैलाड परिसरात स्वच्छता व आरोग्य सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पांढरी परिसरात उघड्या गटारी, सांडपाणी, प्लास्टिक कचरा व दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘कचरा टाकू नये’ असा फलक असतानाही तेथे कचऱ्याचे ढीग साचले असून उघड्या गटारींमध्ये गाळ, प्लास्टिक व सांडपाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पैलाड भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहही पाणी व वीजअभावी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. दरवाजे तुटलेले, परिसरात गवत-झुडपे वाढलेली व कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शिवाजीनगर चौकातील नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना छोट्या-मोठ्या उपचारांसाठी दूर जावे लागत आहे. तसेच परिसरातील 80 फुटी रस्ता झाडांच्या विळख्यात अडकून अरुंद झाला असून गटारी नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचत आहे.
दरम्यान, तेथील नगरसेवक यांनी या समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे यांनी शिवाजीनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नाला साफसफाई, झाडे-झुडपे काढणे व जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना साफसफाई व आवश्यक दुरुस्तीचे आदेश दिले असून मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक तयार केल्याची माहिती दिली.