कॉपीमुक्त बोर्ड परीक्षांसाठी PTA चे निवेदन.
अमळनेर – दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे आज (९ फेब्रुवारी) शिक्षण विभागाला निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना देण्यात आले. यावेळी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनिल पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात मागील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्यामुळे गुणफुगवटा वाढून गुणवत्तापूर्ण व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर कठोर दक्षता नसेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे मत व्यक्त करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात PTA तर्फे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, परीक्षांतील प्रामाणिकता टिकवण्यासाठी कठोर उपाययोजना करून मुक्त कॉपीला आळा घालावा, अशी विनंती करण्यात आली आहे.