रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे भव्य आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे भव्य आयोजन

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी सीआयएसएफचा राष्ट्रव्यापी पुढाकार

मुंबई/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या 57 वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन केले आहे. या सायक्लोथॉनचा भव्य शुभारंभ 14 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर होणार असून उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ केला जाणार आहे.

या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे, नागरिकांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करणे, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात 50 टक्के महिला सायकलपटूंचा सहभाग असून, हा उपक्रम लैंगिक समानतेचे प्रभावी प्रतीक ठरणार आहे.

किनारी नागरिकांमध्ये सुरक्षेचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न

या सायक्लोथॉनच्या माध्यमातून किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, नागरिक आणि सीआयएसएफ यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यांबाबत सावध करणे तसेच बंदर सुरक्षेतील सीआयएसएफच्या 51 वर्षांच्या अनुभवाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे.

🟡57 वर्षांची गौरवशाली सेवा

1969 साली स्थापन झालेल्या सीआयएसएफने गेल्या 57 वर्षांत देशातील रिफायनरीज, विमानतळ, बंदरे, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ संशोधन केंद्रे यांसारख्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफने राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जपली आहे.

🟣6,600 किलोमीटरचा प्रेरणादायी प्रवास

‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी झालेल्या सायक्लोथॉन–2025 ला देशभरातून 30 लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता, तर 2.9 कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते.

🟢52 किनारी गावे ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक

सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी सीआयएसएफने 52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेतले आहे. या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुल्या व्यायामशाळा, क्रीडा सुविधा उभारण्यात येत असून तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

🟤शहीद जवानांना श्रद्धांजली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

14 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील पोलीस मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 साली पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा सांस्कृतिक पथक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असून संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या वातावरणात संपन्न होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!