करमाळ्यात बुलेटस्वारांचा ‘धुमाकूळ’; सायलेन्सरच्या फटाक्यांनी नागरिक हैराण, पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहरात सध्या काही हौशी तरुणांनी आपल्या बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यांसारखे आवाज काढण्याचा नवा ‘ट्रेण्ड’ सुरू केला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी अचानक होणाऱ्या या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांमुळे नागरिक, वृद्ध आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा उपद्रवी बुलेटस्वारांवर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील मेन रोड, एसटी स्टँड परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवरून दुचाकी फेरफटका मारताना काही युवक ‘सायलेन्सर ब्लास्ट’ करत आहेत. यामुळे एखादा स्फोट झाल्याचा भास होतो. विशेषतः शाळा, रुग्णालये आणि महाविद्यालय परिसरातून जातानाही हे तरुण वेगावर नियंत्रण न ठेवता अशा प्रकारे आवाज काढत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या महिला किंवा सायकलस्वार अचानक होणाऱ्या या आवाजा मुळे घाबरून तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. सदरचे बुलेट स्वार नियमांचे उल्लंघन करून सायलेन्सरमध्ये बदल करीत असून हे कायद्याने गुन्हा असतानाही सर्रासपणे असे प्रकार सुरू आहेत.

शहरातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी या प्रकाराचा निषेध केला केला असून शहरातील शांतता अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे भंग पावत आहे.
रस्त्यावर स्टंटबाजी करणे आणि सायलेन्सरचे फटाके फोडणे हा जोश नसून तो सर्वसामान्यांसाठी त्रास आहे. पोलिसांनी अशा बुलेट जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी भावना करमाळा शहरातील संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आता करमाळा पोलीस प्रशासन या रोडरोमिओंना कसा लगाम घालणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!