टाकरखेडे ग्रामपंचायतीत वित्त आयोग निधीचा घोटाळा? भर ग्रामसभेत ग्रामस्थांचे आरोप..
अमळनेर : विक्की जाधव.
टाकरखेडे गावात झालेल्या ग्रामसभेत गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीला मिळालेल्या वित्त आयोगाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचा स्फोटक आरोप ग्रामस्थांनी केला. विहीर खोलीकरण, स्वच्छता-फवारणी, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व साहित्य खरेदी या कामांत प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदावर खर्च दाखवून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे ग्रामसभेत उघड झाले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विहीर खोलीकरणाच्या कामात प्रत्यक्ष खोली व मोजमाप आणि दाखवलेला खर्च यामध्ये प्रचंड तफावत आहे. काही ठिकाणी काम झालेच नसताना पूर्ण खर्च दाखवण्यात आल्याचे आरोप झाले. तसेच ZP शाळेच्या दुरुस्ती व साहित्य खरेदीसाठी निधी खर्च झाल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात काम अपूर्ण किंवा अस्तित्वातच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.फवारणी कामातही एकाच व्यक्तीच्या नावावर वारंवार देयके अदा झाल्याचे समोर आले असून, त्या व्यक्तीला गावात प्रत्यक्ष काम करताना कोणीही पाहिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे, या सर्व कामांचे बिल, फोटो, मस्टर रोल व मोजमाप पुस्तिका ग्रामसभेत सादर करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे संशय अधिकच बळावला.सरपंच व ग्रामसेवकांकडे जाब विचारूनही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त झाला. ग्रामस्थांनी सखोल चौकशी, तांत्रिक ऑडिट, दोषींवर फौजदारी गुन्हे आणि अपहाराची रक्कम तात्काळ वसूल करण्याची मागणी केली आहे. “गावचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा देत प्रशासनाने दखल न घेतल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.