उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; राज्यभरातून जनसागर, मान्यवरांची अभूतपूर्व उपस्थिती.
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर शासकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य व केंद्र सरकारमधील अनेक मान्यवर, विविध क्षेत्रातील नेते, अधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते.
अंत्यसंस्कार सोहळ्याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शासकीय इतमामानुसार पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु. आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर यांच्यासह असंख्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंत्यसंस्कारापूर्वी पहाटेपासूनच विद्या प्रतिष्ठान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या. शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी भावूक वातावरणात आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देत होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर ‘साहेब अमर रहें’च्या घोषणा ऐकू येत होत्या.
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, प्रशासनावरील पकडीला आणि जनतेशी असलेल्या थेट नात्याला उपस्थितांनी शब्दांतून व अश्रूंमधून श्रद्धांजली अर्पण केली.
