प्रजासत्ताक दिनी तिरंगा अंधारात! अमळनेर नगरपालिकेची निष्क्रियता उघड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्य अधिकारी जबाबदार कोण?
अमळनेर : विक्की जाधव
प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशीसुद्धा अमळनेर शहराच्या मुख्य रस्त्यालगत असलेला तिरंगा चौकातील शहरातील सर्वात उंच तिरंगा ध्वज २६ जानेवारीच्या रात्री अंधारातच राहिला. या ठिकाणी सुशोभीकरणासाठी लावलेले लाइट्स अक्षरशः बंदा अवस्थेत दिसून आलेत हा अमळनेर नगरपालिकेच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा असल्याची तीव्र प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे. लाखो रुपयांचे टेंडर मंजूर असतानाही राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेला तिरंगा अंधारात राहणे ही अत्यंत लज्जास्पद बाब मानली जात आहे.

अक्षरशा: अंधारात असलेला तिरंगा ध्वज
या प्रकरणात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी जबाबदारी झटकून टाकली आहे का? असा थेट सवाल नागरिक करत आहेत. राष्ट्रीय सणाच्या दिवशीसुद्धा तिरंगा चौकाची पाहणी करण्याची गरज कोणालाच वाटली नाही का? की प्रशासनाला शहराच्या प्रतिष्ठेपेक्षा केवळ खुर्ची आणि कागदोपत्री कारभार महत्त्वाचा आहे? अशी संतप्त चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

ध्वजावर प्रकाश निर्माण व्हावा यासाठी लावलेले लाईट बंद अवस्थेत
तिरंगा चौकासाठी मंजूर करण्यात आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला, कामाची जबाबदारी असलेल्या ठेकेदारावर कारवाई का करण्यात आली नाही, आणि देखभाल व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी झोपेत होते का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, हलगर्जीपणा आणि निष्क्रियतेमुळे शहराचा मान खाली गेल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी किंवा संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्य अधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर स्पष्टीकरण द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा अमळनेरकर शांत बसणार नाहीत, असा इशारा विजय पाटील प्रभाग क्र 10 चे नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी दिला आहे.
